नांदेड : संविधान दिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय सेवा योजना स्वा.रा.ति.म. विद्यापीठ आणि ज्ञानविकास शिक्षण संस्था, कापशी (बु.) ता. लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान मूल्य जागृती रॅलीचे आयोजन आज(दि.२६) करण्यात आले.
रॅलीची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. मारोती गायकवाड यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून व हिरवा झेंडा दाखवून झाली.
संविधानाने भारतीय जनतेस स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूलभूत मूल्ये दिली असून, त्या संविधानाचा सन्मान करणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन ज्ञानविकास शिक्षण संस्थेचे शुद्धोधन कापसीकर यांनी केले.
रॅलीमध्ये भूशास्त्र संकुलाचे डॉ. अविनाश कदम, सायन्स महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. शुक्ला, महात्मा फुले शाळेचे विद्यार्थी-शिक्षक, आंबेडकर नगर येथील त्रिरत्न लेझीम पथक तसेच शहरातील विविध महाविद्यालयांच्या रा.से.यो. युनिटचे कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आला.
रॅली यशस्वी करण्यासाठी ज्ञानविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक कापसीकर, आतिश ढगे, ईश्वर सावंत, ऋषभ महादळे, सौरभ महादळे, विकास हिंगोले, शुभम सुर्यवंशी, दिनेश सिंगाडे, उद्धव बोयवारे, महेश गजभारे, सत्यजित पोवळे, यशवंत ढगे, गोपालसिंग टाक, सचिन पवळे, चंद्रकांत तारु, वैभव लष्करे, अतुल मांजरमकर, राम जोगदंड, राम पोवळे, यशस पोवळे, अमरदीप कांबळे, रोहन गजभारे, हंसराज कांबळे, प्रणव गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.




