मुंबई : CITU (सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स) चे महाराष्ट्र राज्याचे १७ वे अधिवेशन ५, ६ व ७ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत आयोजित करण्यात आले असून, या अधिवेशनात विविध महत्त्वाच्या मागण्या जोरदारपणे मांडण्याची तयारी झाली आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या हक्कांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू असून ICDS ला उपविभागाचा दर्जा देऊन सेविका-मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी या अधिवेशनात प्राधान्याने केली जाणार आहे. तसेच किमान वेतन, ग्रॅच्युइटी आणि मासिक पेन्शन योजना लागू करावी, अशी एकमुखी भूमिका या अधिवेशनातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
अंगणवाड्यांतील लाभार्थ्यांच्या पोषण आहाराचा दर्जा उंचावण्यासाठी प्रति लाभार्थी आहाराचा दर वाढविण्याची मागणीही यावेळी जोरदारपणे मांडली जाणार आहे. याशिवाय सेविका व मदतनिसांना मिळणारे २,००० आणि १,००० रुपयांचे प्रोत्साहन भत्ते मानधनात रुपांतरित करावेत, अशीही मागणी या अधिवेशनात होणार आहे.
अंगणवाडी वर्गातील महिलांच्या हक्क व सन्मानाच्या प्रश्नांवर निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार CITU च्या नेतृत्वाने या पार्श्वभूमीवर व्यक्त केला आहे.
