राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत वैष्णवी बेंद्रेची दमदार कामगिरी; कास्यपदकाची कमाई

 किनवट : गोकुंदा केंद्रातील मातोश्री कमलताई ठमके कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीची विद्यार्थीनी वैष्णवी संजय बेंद्रे हिने पुणे जिल्ह्यातील बारामती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदकाची पटकावले असून तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५-२६ या वर्षासाठी राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील डोंगरी व आदिवासी भागातील किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील वैष्णवीने १७ वर्षे वयोगट व ४० किलो वजनगट या विभागात तृतीय क्रमांक मिळवत क्रीडा कौशल्य सिद्ध केले.

पारंपरिक खेळांबरोबरच इतर क्रीडाप्रकारांतही प्रावीण्य मिळवत वैष्णवीने राज्यस्तरावर चमक दाखविली आहे. तिच्या या यशामुळे ती आता महाराष्ट्र शासनाच्या नोकरीतील ५% क्रीडा आरक्षणासाठी पात्र ठरली आहे, ही तिच्यासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.

बारामती येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, एशियन पदक विजेते व कराटे असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव संदीप गाडे यांच्या हस्ते वैष्णवीला प्राविण्य प्रमाणपत्र व कास्यपदक प्रदान करण्यात आले. यावेळी तिचे क्रीडा शिक्षक व राष्ट्रीय प्रशिक्षक संदीप येशीमोड उपस्थित होते.

वैष्णवीच्या या भरीव यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, संस्थेचे अध्यक्ष अभि. प्रशांत ठमके, सचिव व प्राचार्या शुभांगीताई ठमके, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास होनधरणे, केंद्रप्रमुख उत्तम कानिंदे, प्राचार्या स्वाती बनसोड-डवरे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व मान्यवरांनी अभिनंदन करून तिचे मनोबल वाढवले.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp