Type Here to Get Search Results !

भीमा-कोरेगाव शौर्यदिन : अनुयायांसाठी सुविधा वाढवाव्यात — भीमा कोरेगाव संरक्षण समितीची मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती

 पुणे : येत्या १ जानेवारी २०२६ रोजी भीमा-कोरेगाव (पेरणे) येथे पार पडणाऱ्या शौर्यदिनानिमित्त देशभरातून लाखों अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. वाढत्या गर्दीची शक्यता लक्षात घेता भीमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनुयायांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी शासनाला सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शौर्यदिन हा आंबेडकरी समाजाचा ऐतिहासिक दिवस असून या दिवशी लाखोंचे आगमन होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी शासनाने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

समितीच्या प्रमुख मागण्या :
• विजयस्तंभाची फुलांनी सजावट व परिसरात विद्युत रोषणाई
• सुरक्षा यंत्रणांची मजबूत व्यवस्था; महिला-पुरुष होमगार्डची नेमणूक
• पिण्याच्या पाण्याची सोय, स्वतंत्र शौचालये, सीसीटीव्ही, उंच माईक मनोरे व सुलभ पार्किंग
• ३.८६ आर परिसरात साहित्य, पुस्तके व समाजजागृती स्टॉल मोफत लावण्याची परवानगी
• शौर्यदिन काळात परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारणे
• पुणे–शिक्रापूर–पेरणे येथे दर पाच मिनिटांनी बस सेवा व एसटीची अतिरिक्त फेरी

या सर्व सुविधा शासनाच्या वतीने मोफत उपलब्ध कराव्यात तसेच यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी किंवा अतिरिक्त निधी बार्टी संस्थेला देण्यात यावा, अशी समितीची विनंती आहे.

यंदाच्या शौर्यदिनासाठी शासन कोणती पावले उचलते याकडे राज्यभरातील अनुयायांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments