किनवट : किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रचाराचा थरकाप वाढत असून येत्या २ डिसेंबरला मतदार मतदानासाठी तयार आहेत. या निवडणुकीत खासदार आणि स्थानिक आमदार यांच्यातील अनोखा राजकीय सामना रंगताना दिसतोय. नगराध्यक्ष पदासाठी आणि सभागृही निवडण्यासाठी दोघांकडून जोरदार प्रचार मोहीम राबविली जात आहे.नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीतर्फे भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गट व 'उबाठा' गट यांच्याविरुद्ध थेट संघर्ष रंगला असून, किंवटच्या विविध वार्डांमध्ये प्रचार वेगात आहे. विशेषतः हिंगोलीचे उबाठा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे आणि स्थानिक भाजप आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क मोहिमा जोरात आहेत.मतदार मात्र मतदानाच्या दिवशी मतदानासाठी सज्ज असून, कोणता गट नगराध्यक्षाच्या खुर्चीवर विराजमान होईल आणि सभागृहात कोणते चेहरे दिसतील हे पाहणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. काही प्रभागांत मतदार विकास कामांना प्राधान्य देत आहेत, तर काही ठिकाणी पक्षाचा आधारच मतदानावर प्रभाव टाकत आहे.अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटपाच्या उशीरामुळे प्रचारासाठी वेळ कमी मिळाला असून, परिणामी त्यांच्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याची आव्हाने गंभीर आहेत. यंदा प्रचारासाठी मर्यादित कालावधी असल्यामुळे मतदारांच्या घरी मतदानपूर्व वातावरण काहीसे शांत दिसत आहे.२ डिसेंबरला मतदान झाल्यानंतर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होईल आणि मगच 'किनवटचा पुढील नगराध्यक्ष कोण?' आणि 'सभागृहात कोणते चेहरे?' या प्रश्नांची उकल होणार आहे. त्यामुळे संपूर्ण तालूक्याचे लक्ष निकालाकडे लागलेले आहे.
Tags
||जिल्हा||
