“संविधान सन्मान इव्हेंट नव्हे, बदलाची मूवमेंट उभारण्याची वेळ : दीपक कदम”

 




मुंबई : संविधान दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. रांगोळी, कविता, भाषणे, प्रश्नमंजुषा, संगीत सादरीकरणे, सन्मान सोहळे अशा विविध उपक्रमांनी ७५ वर्षांच्या संविधान स्वीकृती दिनाचा उत्साह साजरा झाला. मात्र हे सर्व ‘इव्हेंट्स’ असून यामधून मूवमेंटचा जन्म होत नाही, असा थेट व परखड सवाल आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी उपस्थित केला.

लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना कदम म्हणाले, “संविधान हा भाषणबाजीचा किंवा पोथीपुराणाचा विषय नाही. शासन–प्रशासन–न्यायव्यवस्था आपल्या ताब्यात घेतल्याशिवाय संविधानाचा खरा सन्मान होऊ शकत नाही.”

ते पुढे म्हणाले, “७५ वर्षे संविधानाचा उत्सव साजरा झाला, पण पुढील २५ वर्षे मूवमेंटची असावीत. २०५० साली संविधान शतकपूर्ती साजरी होईपर्यंत शासनाच्या सर्व यंत्रणा आपल्या हाती असणे गरजेचे आहे. इव्हेंट्स नव्हे, तर संघटन व संघर्ष यांची दिशा घ्या.”

संविधानाच्या १०० वर्षांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी २०२५ ते २०५० हा निर्णायक कालखंड असल्याचे मतही कदम यांनी व्यक्त केले. संविधान मूल्यांची अंमलबजावणी केवळ कार्यक्रमांमधून नव्हे तर संघटित शक्ती, नेतृत्व विकास, आणि प्रशासनिक सहभागातून होईल, असा ठाम संदेश त्यांनी दिला.





Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp