किनवट : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम पारदर्शक आणि शांततेच्या वातावरणात पार पडावा यासाठी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन नि
डणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी केले.
नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर गुरुवारी (ता. ६) पालिका कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.
डॉ. चौंडेकर म्हणाल्या, “किनवट नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ता .१० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत (रविवार वगळता) वेबसाईटवर नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल. सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी व स्वीकृती प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, नगर परिषद ,किनवट येथेच पार पडेल.”
नामनिर्देशनपत्रांची छाननी ता. १८ नोव्हेंबर रोजी होईल. वैध उमेदवारांची यादी त्याच दिवशी प्रसिद्ध केली जाईल. अपील दाखल करण्यासाठी ता. १९ ते २१ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत राहील,तर उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख ता. २५ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.
उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप आणि अंतिम यादी ता. २६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान प्रक्रिया ता. २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल. मतमोजणी ता. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून नगर परिषद कार्यालयात केली जाणार असून, निकाल ता. १० डिसेंबर रोजी राजपत्रात प्रसिद्ध केला जाणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता पथकांची स्थापना करण्यात आली असून, शहरातील कोणताही प्रभाग संवेदनशील नसल्याची माहिती डॉ. चौंडेकर यांनी दिली.
या पत्रकार परिषदेस अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार चंद्रशेखर सहारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व प्रभारी मुख्याधिकारी विवेक कांदे तसेच पोलीस निरीक्षक गणेश कराड उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments