किनवट : तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, कापूस, मका आदी शेतमालाची गाव पातळीवर हमीभावाने खरेदी करावी, या मागणीचे निवेदन आज(ता.६)विविध शेतकरी संघटनांच्या वतीने उपविभागीय अधिकारी झेनिथ दोनतुल्ला यांना देण्यात आले.
ही मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष, अखिल भारतीय किसान सभा तसेच किनवट तालुक्यातील विविध शेतकरी आघाड्यांनी संयुक्तरित्या केली.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केंद्र शासनाच्या प्रयत्नांना पूरक म्हणून उत्पादन खर्च कमी करण्याची गरज असल्याचे संघटनांनी नमूद केले. खरेदी केंद्रावर माल पोहोचवताना बारदाना, वाहतूक, हमाली आदी खर्चामुळे प्रति क्विंटल सुमारे २०० रुपये अतिरिक्त भार शेतकऱ्यांवर पडतो, तसेच खरेदी केंद्रावर तुट, लूट आणि त्रासाचा सामना करावा लागतो, असे निवेदनात म्हटले आहे.
“आधीच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या शोषणातून मुक्त करणे, त्यांचे मनोबल वाढवणे आणि आत्महत्यांचे प्रमाण कमी करणे हे शासनाचे कर्तव्य आहे,” असा सूर निवेदनात आढळतो.
किनवट तालुका हा अतिदुर्गम आणि अविकसित असल्याने येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असल्याचे नमूद करून, गाव पातळीवर खरेदी योजना राबविणे शक्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शासनाकडे आवश्यक यंत्रणा आधीच उपलब्ध असल्याने कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.
तेलंगणा प्रमाणे गाव पातळीवर खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांच्या लुटीला आळा बसेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. शासनाने आठ दिवसांच्या आत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा ता. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता किनवट उपविभागीय कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
निवेदनावर रमेश साहेबराव कदम (शेतकरी संघटना), सतिश बोंतावार (प्रहार जनशक्ती पक्ष), आडेल्लु बोनगीरवार (अखिल भारतीय किसान सभा) यांच्यासह गजानन चव्हाण, पंढरीनाथ वाघमारे, प्रकाश जमादार, दादाराव डोंगरे, हरी वाकळे, राजू जमादार, अविनाश पवार, ज्योतीबा डोंगरे, विक्रांत इजारे, रमेश परतवाघ, रामराव जमादार, उत्तम डोंगरे, विजय वाळके, तुकाराम मुरमुरे, ज्ञानेश्वर आगलावे, संतोष आनकाडे, गजानन थोरात, प्रशांत दहिफळे, प्रकाश नानू जाधव, गजानन पोळकट आदी शेतकरी नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment
0 Comments