किनवट : किनवट–माहूर विधानसभा क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, पंचायत समिती) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी (वं.ब.आ.) आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांच्यात युती झाली आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ३१ ऑक्टोबर रोजी किनवट येथे पार पडली. या बैठकीत सर्व जागांवर एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष निखिलभाऊ वाघमारे, तालुका महासचिव दुधराम भोजू राठोड, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. शंकर सिडाम आणि तालुका सचिव काॅ. स्टॅलीन अर्जुन आहे उपस्थित होते.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत मनुवादी, जातीवादी आणि धर्मांध शक्तींविरुद्ध लढा देण्यासाठी धर्मनिरपेक्ष, शोषित आणि बहुजन समाजाची एकजूट आवश्यक असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. दोन्ही पक्षांनी मतैक्याने ठरविले की, किनवट–माहूर विधानसभा क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा युती करून लढविल्या जातील.
युतीबाबतच्या या निर्णयामुळे परिसरात नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच शक्य असल्यास इतर धर्मनिरपेक्ष समविचारी पक्षांनाही या लढ्यात सहभागी करून घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
धर्माध शक्तींना रोखण्यासाठी वंचित, बहुजन व डाव्या विचारसरणीच्या या एकजुटीमुळे आगामी निवडणुकीत विरोधकांना आव्हान उभे राहणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Post a Comment
0 Comments