किनवट : किनवट - माहूर महामार्गावरील घोटी(ता.किनवट) येथील माॅ तुळजाई पेट्रोलियम पंपावर मुलभूत सुविधांचा अभाव आहे.या पेट्रोल पंप चालकांविरोधात प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी मागणी किनवट तालुका ग्राहक पंचायतीने केली आहे.
घोटी परिसरात कार्यरत असलेल्या या पेट्रोल पंपांवर ग्राहकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत मुलभूत सुविधांचा अभाव असलेल्या या पेट्रोल पंप चालकांविरोधात कारवाई करावी , अशी मागणी किनवट तालुका ग्राहक पंचायत या संघटनेचे अध्यक्ष ॲड.मिलिंद सर्पे यांनी केली आहे.
पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालय, बसण्यासाठी जागा, महिलांसाठी स्वतंत्र सुविधा, अग्निशामक यंत्रणा, तसेच प्राथमिक उपचार पेटी यांसारख्या सुविधा या ठिकाणी नाहीत. परिणामी वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
वाहनधारकांना इंधन भरण्यासाठी थांबावे लागते, मात्र या वेळेत पाणी प्यायचे असो किंवा शौचालय वापरायचे असो या ठिकाणी त्या सुविधा उपलब्ध नाहीत. या पंपांवर स्वच्छतेचा अभाव असल्याने तेथे दूषित वातावरण निर्माण झाले आहे.पेट्रोल भरल्यावर ग्राहकांना मागणी करूनही पावती दिली जात नाही. येथे हवा भरण्याची व्यवस्था नाही. फक्त दिखाव्यासाठी हवा भरण्याचे मशिन लावून ठेवले आहे. हवा भरण्याची मागणी केल्यावर हवा भरणार कामगार गावात जेवायला गेला आहे,असे सांगण्यात येते. भरलेले पेट्रोल कमी आलेले आहे व भरलेल्या पेट्रोल मध्ये भेसळ आहे,अशी शंका ग्राहकाने उपस्थित केल्यावरही त्या तपासणी करून दाखवण्यात येत नाही. तसेच तक्रार पुस्तिकेची मागणी केल्यावरही तक्रार पुस्तिका ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत नाही.ती घरी ठेवलेली आहे,असे सांगण्यात येते.
“पेट्रोल पंप परवाना घेताना या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असते. तरीसुद्धा या ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत आहे.”
ग्राहक कल्याणासाठी केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांनी स्पष्ट नियम केलेले असून प्रत्येक पंपावर मुलभूत सुविधा असणे अनिवार्य आहे. तरीदेखील प्रत्यक्षात या नियमांचे पालन होत नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.
त्यामुळे संबंधित तेल कंपन्या व स्थानिक प्रशासनाने निष्काळजी पंपधारकांविरुद्ध कारवाई करावी, तसेच सर्व पंपांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी किनवट तालुका ग्राहक पंचायतीने केली आहे. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींना आळा बसेल, असा जनतेचा विश्वास आहे.

Post a Comment
0 Comments