नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी ५०० कोटी रुपयांचा विकासनिधी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांचा आंबेडकरवादी समाजातर्फे नांदेड येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंत्री सिरसाट म्हणाले,“मी अतिशय सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेतलं. शाळेत दोनच पुस्तके होती, मागच्या बाकावर बसायचो; पण संघर्षातूनच पुढे आलो. वीस वर्ष नगरसेवक, वीस वर्ष आमदार आणि आता मंत्री झालो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कधीही निराश न होता संघर्षाचा मार्ग स्वीकारावा; यश नक्की मिळेल.”
कार्यक्रमात दीपक कदम यांनी आंबेडकरवादी मिशनच्या २५ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “मिशनने कधीही शासनाकडून मदत घेतली नाही; समाजाच्या बळावरच आम्ही उभे आहोत.”
यावेळी कदम यांनी काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या : लंडनमध्ये ‘आंबेडकर हाऊस’ उभारावे, ज्यामुळे १०० विद्यार्थ्यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि बार अॅट लॉसारख्या शिक्षणसंस्थांत प्रवेशाची संधी मिळेल,दिल्ली येथे अधिकारी प्रशिक्षण केंद्र उभारावे, अशी मागणी त्यांनी केली,दलित समाजातून ५ हजार उद्योजक तयार करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा,U
PSC परीक्षेची प्रक्रिया वेळेवर पूर्ण करून विद्यार्थ्यांना जूनमध्ये दिल्लीला पाठवावे, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती १२ हजारांवरून ३० हजार रुपये करण्यात यावी,आरक्षणाचे तुकडे पडू नयेत; कारण त्यातून समाजाचे विघटन होते, अशी भूमिका कदम यांनी स्पष्ट केली.
ते म्हणाले, “या मागण्यांकडे मंत्री महोदयांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे. महाराष्ट्रातील दोन कोटी बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.”
या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, उत्तम सोनकांबळे, डॉ. सुनील कांबळे (कार्डिओलॉजिस्ट), आ. बालाजी कल्याणकर, आ. बोंढारकर, अॅड. दीपक मांजरावर, प्रा. विनोद काळे, देवीदास धबडगे, गौतम कांबळे, डॉ. प्रतिक्षा, डॉ. भद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

