किनवट : दीर्घ प्रतीक्षेनंतर किनवट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्णत्वास जाणार असले, तरी या नव्या रस्त्याचे दुष्परिणाम आता स्थानिक व्यापाऱ्यांना भोगावे लागणार आहेत. नव्या रस्त्याची उंची शहरातील दुकानांपेक्षा सुमारे दोन फूट अधिक झाल्याने, पावसाळ्यात पाणी थेट दुकानात शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरात “नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने” ही म्हण आता या कामावर तंतोतंत लागू झाल्याची चर्चा सुरू आहे. इस्लापूर–किनवट मार्गावरील काही भाग निकृष्ट दर्जाचा झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेषतः बुलढाणा बँक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यानचा भाग दीर्घकाळ रखडल्याने व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. अखेर काम सुरू झाले असले तरी, कमी खोलीचे खोदकाम करून भराव टाकल्यामुळे रस्ता अपेक्षेपेक्षा जास्त उंच झाला आहे.
रस्ता बनला असला तरी दुकानांच्या तुलनेत उंच झाल्याने पावसाचे पाणी थेट दुकानांत घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, रस्त्यालगत असलेल्या विद्युत तारा उंच न झाल्याने वाहनांमुळे त्या वारंवार तुटत आहेत. परिणामी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून, व्यापाऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीकडे वायर उंच स्तरावरून घ्याव्यात, अशी मागणी केली आहे.
२० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नाल्यांचे निकृष्ट नियोजन आजही कायम असून, नव्या रस्त्याचे पाणी जुन्या नाल्यांमधून सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह विस्कळीत होऊन शहरातील स्वच्छतेवरही परिणाम होत आहे.
नागरिकांनी मागणी केली आहे की, रस्त्यालगत नव्या उंच नाल्यांचे बांधकाम करून पाण्याचा प्रवाह व्यवस्थित केल्यास व्यापाऱ्यांना आणि रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल. पावसाळ्यापूर्वीच संभाव्य पूरस्थितीबाबत नागरिक आणि व्यापाऱ्यांनी इशारा दिल्याने संबंधित विभागाने तातडीने दुरुस्तीचे उपाय करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Post a Comment
0 Comments