Type Here to Get Search Results !

लंडन–दिल्लीसह विदेशात ‘आंबेडकर सामाजिक केंद्र’ उभारण्याची मागणी

 मुंबई : महाराष्ट्रातील दलित तरुणांना जागतिक दर्जाचे उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया तसेच दिल्ली येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक केंद्र’ स्थापन करण्याची मागणी आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी सामाजिक न्याय विभागाकडे केली. सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट आणि प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन देण्यात आले.

कदम यांनी सांगितले की, विदेशातील विद्यापीठांमध्ये भारतीय दूतावास आणि आर्थिक केंद्रे कार्यरत असतात. त्याच धर्तीवर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, केंब्रिज, स्टॅनफोर्ड, ऑक्सफर्ड, कोलंबिया, मेलबर्न अशा जागतिक कीर्तीच्या विद्यापीठांच्या सहकार्याने ‘आंबेडकर सोशल एम्बेसी’ ची उभारणी करावी. या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षण, संशोधन आणि जागतिक थिंक-टॅंकचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.

कदम म्हणाले, “नोकरी मिळवणे हा उद्देश न ठेवता निर्णयक्षमता, धोरणनिर्मिती आणि जागतिक नेतृत्वक्षमतेची पिढी घडविणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे परदेशात स्थापन होणारी सामाजिक केंद्रे महत्त्वाची ठरणार आहेत.”

इतिहासातील एका महत्त्वपूर्ण घटनेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना लंडनमध्ये विद्यार्थ्यांसाठी इंडिया हाऊससारखे केंद्र उभारण्याची सूचना केली होती. आर्थिक मर्यादेमुळे ते शक्य झाले नाही; मात्र आज तीच अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले.

दिल्लीमध्ये UPSC विद्यार्थ्यांसाठी ‘आंबेडकर सामाजिक भवन’
दिल्लीमध्ये UPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह, ग्रंथालय आणि भोजन व्यवस्था यांची एकत्रित सुविधा असलेले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन’ उभारण्याची मागणी देखील करण्यात आली.
महाराष्ट्रातील किमान ५०० विद्यार्थी दिल्लीमध्ये स्थायीपणे शिक्षण घेत असल्यास त्यांचा बौद्धिक विकास, व्यक्तिमत्वनिर्मिती आणि राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेतील यशाचे प्रमाण निश्चितपणे वाढेल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

डॉ. आंबेडकरांनी दिल्लीमध्ये असे केंद्र स्थापन करण्याबाबत डॉ. पंजाबराव देशमुखांशी चर्चा केल्याचा उल्लेखही कदम यांनी यावेळी केला.

विद्यार्थ्यांशी निगडित इतर मुद्द्यांवरही चर्चा
दलित उद्योजक घडविण्याची गरज, बार्टी UPSC बॅच दिल्ली केंद्रात नियमितपणे पाठविणे तसेच विद्यार्थ्यांचे विद्यार्थीवेतन वाढविणे (किमान १२ हजार रुपये) या विषयांवरही सविस्तर चर्चा झाली.

या भेटीदरम्यान दैनिक सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे, तसेच लातूरचे सामाजिक कार्यकर्ते सुशील चिकटे आणि सिद्धांत चिकटे उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments