किनवट : नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी ता.१८ रोजी पार पडली असून पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २५ असल्याने सर्वांचे लक्ष ‘लक्ष्मी दर्शना’कडे लागले आहे. माघारीनंतरच अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, नगरपरिषदेच्या दहा प्रभागांतून २१ नगरसेवक आणि एका नगराध्यक्षाची निवड होत आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्षपदासाठी २८ आणि नगरसेवकपदासाठी २६७ अर्ज दाखल झाले होते. अनेक उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याने अर्जांची संख्या फुगली होती. छाननीनंतर अध्यक्षपदासाठी १५ आणि नगरसेवकपदासाठी १२४ उमेदवार पात्र ठरले आहेत.
यावेळी पक्षीय समीकरणांमध्ये मोठी धावपळ झाली. पक्षाचा ‘एबी फॉर्म’ न मिळाल्याने अनेक इच्छुकांची छाननीत माघार झाली. काहींनी ऐनवेळी पक्षांतर करत तिकीट मिळवण्यात यश मिळवले. काही पक्षांना सर्व जागांवर उमेदवार नसल्याने ‘आयते’ उमेदवार मिळाल्याचेही चित्र आहे. प्रभागनिहाय उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी काही पक्षांचे वरिष्ठ कार्यकर्ते धावपळ करताना दिसत आहेत.

Post a Comment
0 Comments