Type Here to Get Search Results !

उर्दू शाळेत मराठी पोवाड्याचा अनोखा जल्लोष; मतदार जागृतीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 किनवट : येथील जवाहेरूल उलूम उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मतदार जागृती अंतर्गत गीते, संकल्प पत्र, शपथविधी आणि पोवाडा अशा विविध उपक्रमांचा रंगारंग कार्यक्रम पार पडला. नेहमी कव्वाली व हिंदी गीतांनी दुमदुमणाऱ्या या उर्दू शाळेत मतदार जागृती निमित्ताने प्रथमच मराठी पोवाड्याची झालेली सादरीकरणे विद्यार्थ्यांसाठी आगळीवेगळी अनुभूती ठरली.

किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर, मुख्याधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विवेक कांदे आणि नायब तहसीलदार चंद्रशेखर सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी तसेच स्वीप नोडल अधिकारी अनिलकुमार महामुने यांच्या पुढाकारातून मतदार जनजागृतीचे (SVEEP) विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

याच मोहिमेअंतर्गत उर्दू शाळेत झालेल्या कार्यक्रमात गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी मतदानाचे कर्तव्य, जबाबदारी आणि मताचे मोल याबद्दल मार्गदर्शन केले. प्रो. डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी पोवाड्याच्या माध्यमातून मतदानाचे महत्व प्रभावीपणे उलगडले. रुपेश मुनेश्वर यांनी मतदार जागृती गीत सादर करत विद्यार्थ्यांकडून घोषवाक्ये घुमवून घेतली. रमेश मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी मतदार शपथ घेतली.

उत्तम कानिंदे यांनी निवेदनातून लोकशाही अधिक सबळ करण्यासाठी मतदानाचे मूल्य, नागरिकत्वाची जबाबदारी आणि संविधानाने दिलेल्या हक्कांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांना पत्र लिहून मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.

या उपक्रमाला मुख्याध्यापिका अस्माखातून अब्दुल गफूर, शिक्षक शेख युनूस, इशरत देशमुख, सनाउल्ला खान, शेख इब्राहीम, फसीउल रेहमान, तरन्नुमबेगम, सानियाबेगम, मोहम्मद अतीक, इम्रान खान, मोहम्मद लईक यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments