दरसांगवीतील अरविंद सूर्यवंशी यांची आधुनिक पेरू बाग आदर्श ठरली


किनवट :
तालुक्यातील दरसांगवी येथील प्रगतशील शेतकरी अरविंद सूर्यवंशी यांनी उभारलेली पेरू बाग सध्या परिसरातील नाविन्यपूर्ण शेतीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शास्त्रशुद्ध व्यवस्थापन तसेच बाजारपेठेचा अभ्यास यांचे योग्य मिश्रण त्यांच्या बागेत पाहायला मिळते. या बागेचा आढावा घेण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड आणि तहसीलदार डॉ. शारदा चोंडेकर यांनी नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

भेटीदरम्यान बागेतील झाडांची वाढ, ठिबक सिंचन, सेंद्रिय खतांचा वापर, मिश्र पिके, छाटणी पद्धती तसेच निर्यातक्षम पेरू उत्पादनातील तंत्रांचा अभ्यास करण्यात आला. लागवडीच्या काळात पाणीटंचाई असतानाही पाण्याचे सुयोग्य नियोजन करून बाग फुलविल्याबद्दल अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

शेतकरी अरविंद सूर्यवंशी यांनी दीड एकर शेतीत लावलेल्या १५०० पेरू झाडांमधून तब्बल २ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले असून यामध्ये आंतरपीक म्हणून हरभरा व भाजीपाला घेतला. कमी खर्च, सेंद्रिय खतांचा वापर आणि योग्य व्यवस्थापनामुळे आर्थिकदृष्ट्या शाश्वत शेती कशी करता येते याचे उत्तम उदाहरण त्यांनी सादर केले.

कीड-रोग व्यवस्थापनात सेंद्रिय पद्धतीचा अवलंब, कृषी विभाग, आत्मा, मेगा पाणलोट प्रकल्प यांचे मार्गदर्शन व बाजारातील मागणीनुसार गुणवत्तापूर्ण पेरू उत्पादन करीत असल्याबद्दल अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले. बागेची उत्पादकता, झाडांची सुदृढ अवस्था व स्वच्छ वातावरण पाहून तहसीलदार डॉ. चोंडेकर यांनी अन्य शेतकऱ्यांनीही अशी आधुनिक, शाश्वत शेती पद्धती अंगीकारावी असे आवाहन केले.

भेटीदरम्यान तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, कृषी विभागातील अधिकारी, राष्ट्रविकास संस्थेचे गंगाधर घ्यार, रवी उबाळे, संदीप बेलकर, सुदर्शन गयाळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, तहसीलदार डॉ. शारदा चोंडेकर व शेतीतज्ञांच्या भेटीमुळे मोठा उत्साह मिळाला आहे. भविष्यात आणखी नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून बाग विकसित करणार आहोत. ही भेट स्थानिक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

— शेतकरी अरविंद सूर्यवंशी


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp