किनवट : "साने गुरुजी मल्टीस्पेशालिटी विश्वस्त रुग्णालय हे केवळ उपचार देणारे केंद्र नसून लोकसहभागातून उभारलेला सामाजिक दीपस्तंभ आहे,” असा गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर, नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाणे व पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी काढला. ग्रामीण-आदिवासी भागातील आरोग्य सुविधांची उणीव अधोरेखित करत अशा प्रकल्पांची गरज त्यांनी ठळकपणे मांडली.
कोठारी (ता. किनवट) येथील एमआयडीसी परिसरात बांधलेल्या या रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक, उद्योजक मदनलाल बलदोटा, डॉ. योगेंद्र वरडकर, नगराध्यक्षा सुजाता एन्ड्रलवार, डॉ. शुभांगी अहंकारी, सरपंच ईश्वर आरके, सुधाकर कडू, गिरीश क्षीरसागर व व्यंकटेश जोशी यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
डॉ. तात्याराव लहाणे यांनी वैयक्तिक अनुभव शेअर करत मातृऋण आणि आरोग्यसेवेचे महत्त्व सांगितले. मोबाईलच्या अतिवापरामुळे वाढणाऱ्या दुष्परिणामांबद्दल त्यांनी विशेष सूचना दिली. “पूर्वी उपचारासाठी अडीचशे किलोमीटरचा प्रवास करावा लागे, मात्र आता ही गरज किनवटातच पूर्ण होणार आहे,” असे ते म्हणाले.
• “बाबामय आयुष्य” – डॉ. बेलखोडे
प्रास्ताविक करताना रुग्णालयाचे संस्थापक डॉ. अशोक बेलखोडे म्हणाले,
“बाबा आमटे यांच्या विचारांनी आम्हाला घडवले. निष्ठा व लोकसहभागाच्या जोरावर देशभरातून मिळालेल्या सहकार्यातून हा प्रकल्प उभारला. आता तो सुचारूपणे चालविण्याची जबाबदारी किनवटकरांवर आहे.”
• ‘दरवाजा नसलेले रुग्णालय’ – सर्वांसाठी समतेची सेवा
डॉ. अभय बंग म्हणाले, “या रुग्णालयाचे दरवाजे प्रत्यक्ष आणि तत्त्वत: सर्वांसाठी खुले आहेत. आदिवासी, वंचित व सर्वसामान्यांना परवडणारी व सहज उपलब्ध सेवा देण्याचा हा आदर्श प्रयत्न आहे.”
जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी, “मान्यवरांची गर्दी हीच डॉ. बेलखोडे यांच्या कार्याची मोठी दाद आहे,” अशी दखल घेत प्रशंसा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शारदा कदम व संदीप काळे यांनी केले. आभार धर्मराज हल्लाळे यांनी मानले.
Tags
||महाराष्ट||


