नांदेड : सक्षम ताटे या तरुणाच्या निर्घृण हत्येनंतर नांदेड शहर हादरले असताना, आता प्रशासकीय पातळीवरून पीडित कुटुंबाची मदत करण्यास सुरूवात झाली आहे. ऑनर किलिंगच्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यभरात तीव्र प्रतिक्रियांचा भडका उडाला असून, समाज कल्याण विभागाने कुटुंबाच्या पुनर्वसनाचा निर्णय घेत महत्त्वाची मदत जाहीर केली आहे.
सक्षम ताटे हा २० वर्षीय तरुण आणि सिद्धनाथपुरी येथील १९ वर्षीय आचल मामीडवार यांच्यात मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, या नात्याला मुलीच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. अखेर २७ नोव्हेंबर रोजी मिलिंद नगर परिसरात आचलचे वडील गजानन मामीलवाड, भाऊ साहिल आणि त्यांच्या साथीदारांनी सक्षमवर गोळ्या झाडून तसेच फरशीने ठेचून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आचलची आई जयश्री मामीडवार, सोमेश लखे, वेदांश कुंदेकर, अमन शिरसे यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल करून एकूण आठ जणांना ताब्यात घेतले आहे. तपास जलदगतीने सुरू असून पोलिसांकडून अधिक तपास कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, समाज कल्याण विभागाने सक्षम ताटे यांच्या कुटुंबीयांना एकूण ८ लाख २५ हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली असून यापैकी ४ लाख १२ हजार ५०० रुपये पहिला हप्ता म्हणून कुटुंबाच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. उर्वरित मदत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर दिली जाणार आहे. तसंच, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यानेही आपल्या प्रतिष्ठेचा पुरस्कार सक्षमच्या स्मृतीला समर्पित करत समाजाला अंतर्मुख करणारा संदेश दिल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.
सक्षम ताटे यांच्या कुटुंबास दिलेली ही मदत केवळ आर्थिक स्वरूपाची नसून, दुर्दैवी प्रसंगांत शासन त्यांच्यासोबत असल्याचा दिलासा देणारी आहे. या घटनेनंतर समाजात निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर शासनाची ही कारवाई आश्वासक असल्याचे विविध सामाजिक घटकांकडून व्यक्त केले जात आहे.
