‘भारतीय संविधानातून मानवी हक्काचा जाहीरनामा’ या विषयावर प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन


किनवट, ता. ८ :
मिलींद शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाडी तथा महात्मा ज्योतीबा फुले माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा (ता. किनवट, जि. नांदेड) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय संविधानातून मानवी हक्काचा जाहीरनामा’ या विषयावर मंगळवार, दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या व्याख्यानासाठी प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले असून ते सुप्रसिद्ध समाजसेवक, ख्यातनाम व्याख्याते तसेच संविधान विषयाचे गाढे अभ्यासक आहेत. विशेष म्हणजे संविधानाचे सखोल अध्ययन करून ‘संविधान आचार्य’ ही पदवी प्राप्त करणाऱ्या थोड्याच अभ्यासकांमध्ये डॉ. गवई यांचा समावेश आहे.

भारताच्या संविधानातून उद्भवलेले मानवी हक्क, मूलभूत अधिकार, नागरी स्वातंत्र्य, तसेच सामाजिक न्याय यांचे संवैधानिक अधिष्ठान सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि त्याचे वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण करणे, हा या व्याख्यानाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत संविधानिक मूल्यांविषयी जनजागृती वाढवणे, संविधानिक कर्तव्यांचे भान निर्माण करणे व मानवाधिकारांच्या संवैधानिक चौकटीचे महत्त्व पटवून देणे हा या कार्यक्रमाचा धागा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सदर व्याख्यान दुपारी ३ वाजता महात्मा ज्योतीबा फुले माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार असून या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी संस्थेमार्फत सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp