🩺 किनवटमध्ये आधुनिक आरोग्यसेवेचे नवीन पर्व २४ डिसेंबरला साने गुरुजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण


किनवट : किनवट व परिसरातील नागरिकांना अद्ययावत, खात्रीशीर आणि परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने भारत जोडो युवा अकादमीतर्फे उभारण्यात आलेल्या साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा येत्या २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता एम.आय.डी.सी. कोठारी (ता. किनवट) येथे होणार आहे.

या लोकार्पण समारंभाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे हे भूषवणार असून, पद्मश्री डॉ. अभय बंग (सर्च, गडचिरोली), सुश्री मेधाताई पाटकर (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या) आणि पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमास हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. नागेश पाटील आष्टिकर तसेच किनवट–माहूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. भीमराव केराम हे मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

स्थानिक पातळीवर गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी या रुग्णालयाची उभारणी महत्त्वाची ठरणार असून, ‘परवडणाऱ्या दरात आधुनिक उपचार’ हे या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या उदघाटन सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन
माधव बावगे (सचिव) आणि डॉ. अशोक बेलखोडे (अध्यक्ष) तसेच साने गुरुजी हॉस्पिटल परिवाराने केले आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp