सामाजिक सेवा, आरोग्य आणि संस्कृतीचा उत्सव : किनवटमध्ये २४ ते २६ डिसेंबरदरम्यान भव्य कार्यक्रम


किनवट :
 जेष्ठ समाजसेवक आणि सुप्रसिद्ध मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता साने गुरुजी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या भव्य लोकार्पण सोहळ्याने सामाजिक सेवा, आरोग्य आणि सांस्कृतिक उपक्रमांची मालिका किनवटमध्ये सुरू होणार आहे. या उपक्रमांचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. विकास आमटे भूषवणार आहेत.

या लोकार्पण सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून पद्मश्री डॉ. अभय बंग (सर्च, गडचिरोली), मेधाताई पाटकर, सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. गिरीषभाऊ गांधी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे,अशी माहिती साने गुरुजी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे प्रमुख डॉ.अशोक बेलखोडे यांनी दिली.

सायंकाळी ५ वाजता संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सारेगमप आणि लिटील चॅम्प फेम अंजली व नंदिनी अंगद गायकवाड यांच्या सुरेल गीतांचा मनमोहक कार्यक्रम रसिकांसाठी आयोजित केला आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबर रोजी सका० वाजता भव्य सर्वरोग निदान शिबीर होणार आहे. विविध आजारांचे तपासणी, उपचार, मार्गदर्शन आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया अशा सर्व सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्जरी, छातीचे विकार, डोळ्यांचे विकार इत्यादी विभागांतील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती असेल.

सायंकाळी ५ वाजता कवी सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले असून “मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा” फेम सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत, “तुझ्या दाराहून जाता” फेम कवी प्रकाश घोडके तसेच “तुझ्या रुपाचं चांदणं” फेम गीतकार डॉ. विनायक पवार यांच्या काव्यरचना रसिकांसमोर सादर होतील.

तिसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता खास मुलांसाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दुपारी आणि सायंकाळी परिसरातील बालकलाकारांना आपले कला कौशल्य सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. गायन, वादन, नृत्य, मिमिक्री आणि नाटिका अशा विविध सांस्कृतिक सादरीकरणांतून छोट्या कलाकारांचे गुणात्मक प्रदर्शन अनुभवायला मिळणार आहे.

किनवट तालुक्यातील नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकी, आरोग्यसेवा आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचा संगम घडवणारे हे कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहेत.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp