साने गुरुजी जयंती निमित्त किनवटमध्ये कवी संमेलन उत्साहात


किनवट, दि.२९ : “कवितेतून मानवतेचे चिंतन व्हावे, संवेदनांना जाग यावी; वास्तवाचे बी पेरून प्रबोधन व्हावे” असे स्पष्ट मत प्रसिद्ध कवी अनंत विठ्ठल राऊत यांनी व्यक्त केले. साने गुरुजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच साने गुरुजी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या लोकार्पणाचे औचित्य साधून आयोजित भव्य कवी संमेलनात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गुलाबी थंडीत रंगलेल्या साहित्यसोहळ्याला काव्यमय गारवा लाभला. विचारमंचावर कवी प्रकाश घोडके (अध्यक्ष), प्रभाकर साळेगावकर, भारत सातपुते आणि डॉ. विनायक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

अनंत राऊत यांनी “दुःख अडवायला उंबऱ्यासारखा… मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा‌” ही हृदयस्पर्शी कविता सादर करत मानवी नात्यांची ऊब जागवली. पुढे सामाजिक विषमता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि मानवी हक्क या संदर्भातील प्रभावी ओळींनी रसिक थक्क केले. "मी तुकोबा माणसाच्या आत पेरत चाललो…" या कवितेने तर सभागृहात टाळ्यांचा गजर घडवला.
साळेगावकर यांनी “बळ उड्या दे रे सूर्य हाती यावा…” सारख्या प्रभावी रचना मांडत कवितेच्या विविध आकृतीबंधांवर प्रकाश टाकला. डॉ. विनायक पवार यांनी शेतकरी व प्रेम कवितांनी वातावरण भारून टाकले. भारत सातपुते यांनी मानवी जीवनाचे वास्तव काव्यातून उभे केले, तर प्रसिद्ध गीतकार प्रकाश घोडके यांनी “तु दाराहून जाताना…” ही सामाजिक  आशय असलेली भावकविता सादर करीत कार्यक्रमाला माधुर्य दिले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सुनिल व्यवहारे यांनी  केले.
या प्रसंगी डॉ. अशोक बेलखोडे, माधव बागवे, सविता शेट्ये, प्रा.रामप्रसाद तौर,राघु मामा, डॉ. भाग्यश्री वरटकर, योगाचार्य अखिल खान, प्रा. गजानन सोनोने, पत्रकार मिलिंद सरपे यांसह कवी, साहित्यप्रेमी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कविसंमेलनाच्या ओघवत्या रचना व सामाजिक जाणिवांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp