
साने गुरुजी
किनवट : एम.आय.डी.सी. कोठारी (ता. किनवट) येथे साने गुरुजी जयंतीनिमित्त दि. २४ डिसेंबर रोजी साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन मेघा पाटकर, डॉ. अभय बंग व डॉ. तात्याराव लहाणे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. समाजाला आरोग्यसेवा पोहोचवण्याचा दृढ संकल्प घेऊन सुरू झालेल्या या रुग्णालयाच्या भविष्यातील योजना जाहीर करताना प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे यांनी "आरोग्य ही केवळ शरीराची अवस्था नसून माणुसकीची कसोटी आहे" या भावनेला उजाळा दिला.
![]() |
| डॉ.अशोक बेलखोडे |
कार्यक्रमात डॉ. बेलखोडे यांनी समाजाभिमुख व लोककेंद्रित अशा दहा महत्त्वपूर्ण योजनांची माहिती देत सांगितले की, रुग्णसेवेला साधना मानून हे हॉस्पिटल सत्य-अहिंसा व करुणेच्या मार्गावर काम करणार आहे.
हॉस्पिटलच्या प्रमुख योजना ; डॉक्टरांसाठी स्वच्छ व सुरक्षित निवासस्थाने, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवासाची सोय,अत्याधुनिक माता-बाल रुग्णालय स्थापन, स्वतंत्र रक्तपेढी उभारणी, प्रसूतीसाठी ‘माहेरघर संकल्पना’, आयुर्वेदिक वनस्पती उद्यान निर्मिती, कर्करोग रुग्णांसाठी सुसज्ज उपचार केंद्र, ज्येष्ठ व मानसिक आजारग्रस्तांसाठी उपचार सुविधा,आरोग्य-सामाजिक सेवकांसाठी प्रशिक्षण केंद्र व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी रुग्ण सहाय्यता निधी.
या सर्व सुविधा उभारताना फक्त पायाभूत संरचना नव्हे, तर दुःखावर फुंकर घालणे व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे हे ध्येय असल्याचेही डॉ. बेलखोडे यांनी नमूद केले.
किनवट परिसरातील आरोग्यसेवेसाठी ही योजना नवी दिशा देणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. समाजाने हातभार लावल्यास या आरोग्यप्रकल्पांना अधिक व्यापक रूप मिळेल, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
Tags
||महाराष्ट||

