किनवट, ता. २३ (बातमीदार): लातूर येथे नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक, कर्मचारी व अधिकारी विभागीय सांस्कृतिक स्पर्धेत किनवट तालुक्यातील शिक्षक बंधू रमेश मुनेश्वर आणि रुपेश मुनेश्वर यांनी आपापल्या कला प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आणि यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद महाविद्यालय, लातूर येथे शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांनाच या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती.
शनिवारपेठ केंद्रातील दरसांगवी (चि.) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक रमेश यादवराव मुनेश्वर यांनी “मी हरलो होतो पण जिंकलो” ही व्यसनाधीनतेवर मात या विषयावरील प्रभावी एकपात्री नाटिका सादर करत भूमिका अभिनय प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.
तसेच मोहपूर केंद्रातील लक्कडकोट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक रुपेश माधवराव मुनेश्वर यांनी शेतकऱ्यांच्या वेदना मांडणारी “शेतकरी बाप” ही स्वलिखित कविता बहारदार सादरीकरणासह सादर करून स्वरचित काव्य लेखन व सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
या दोन्ही शिक्षक बंधूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल डायटचे प्राचार्य अमोल निळेकर, जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षणाधिकारी (प्राथ.) वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी (मा.) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (यो.) दिलीपकुमार बनसोडे, किनवट पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर जम्पलवाड, मनिषा बडगीरे, तसेच विविध केंद्रप्रमुख, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व बहुसंख्य शिक्षक-शिक्षिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

