ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता; विद्यमान सरपंचांनाच तात्पुरते कामकाज?

नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक सतत पुढे ढकलले जात असल्याचा परिणाम आता ग्रामपंचायतींवर दिसू लागला आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत येत्या फेब्रुवारीमध्ये संपत असून, त्यांच्या निवडणुका वेळेत घेता येणार नाहीत, अशी शक्यता प्रशासन स्तरावर व्यक्त होत आहे.

सध्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच महापालिकांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत. या सर्व निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण कराव्या, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे निवडणूक आयोगावर कामाचा प्रचंड ताण आला आहे. त्यातच मर्यादित वेळ आणि वाढलेल्या निवडणूक कामकाजामुळे ग्रामपंचायतींचा कार्यक्रम तातडीने घोषित करण्याची परिस्थिती आयोगासमोर नाही, असा अंदाज वर्तविला जातो.

प्रशासक नियुक्‍तीची दाट शक्यता

फेब्रुवारीनंतर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांची निवड न झाल्यास, प्रशासक नेमण्याची प्रक्रिया अपरिहार्य ठरणार आहे. यामध्ये विद्यमान सरपंचांनाच प्रशासकीय अधिकार देण्याचा पर्यायही उपस्थित होत आहे.

थेट सरपंच निवडणूक ठरणार लक्षवेधी

या वेळी सरपंच निवड थेट मतदारांकडून होणार असल्याने राजकीय स्पर्धा अधिक चुरशीची राहणार आहे. त्यामुळे मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष राहणार असून, इच्छुकांनी सोशल मीडियाद्वारे प्रचाराची सुरुवात केली आहे.

दिवाळीनंतरच होण्याची शक्यता?

फेब्रुवारीतील निवडणुका पुढे गेल्यास मार्चपासून परीक्षा हंगाम, त्यानंतर पावसाळा अशा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया दस-या नंतर किंवा दिवाळीच्या सुमारासच घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp