किनवट : तथागत बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रवाहाचे संवर्धन व प्रसार करण्यासाठी किनवट येथील बुद्धमुर्ती परिसर, समतानगर येथे पंधरावी जागतिक बौध्द धम्म परिषदेचे आयोजन दिनांक १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी (शनिवार-रविवार) करण्यात आले आहे. आंबेडकरी आंदोलनाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या किनवट शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही परिषद मोठ्या उत्साहात होत असून यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
गत चौदा परिषदा भव्य
स्वरूपात पार पाडल्यानंतर पंधराव्या परिषदेकडे आंबेडकरी बांधवांचे लक्ष वेधले गेले आहे. बुद्ध-आंबेडकरी विचारांच्या प्रचारातूनच सांस्कृतिक संघर्ष अधिक प्रखर होतो, या हेतूने दरवर्षी परिषद घेतली जाते, अशी माहिती आयोजकांनी दिली.
या वर्षीच्या परिषदेचे स्वागताध्यक्ष म्हणून पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रा. डॉ. मोहनराव मोरे, दराटीकर यांची निवड करण्यात आली आहे. परिषद यशस्वी व्हावी यासाठी सुनिल भरणे, मिलिंद कांबळे, बाबासाहेब मुनेश्वर, सुरेश कावळे, प्रदिप सावते, चंद्रभीम हौजेकर, माधव शेंद्रे, एकनाथ मानकर, दीपक अडागळे आदी कार्यकर्ते तयारीत आहेत.
आंबेडकरी समाजामध्ये वैचारिक देवाण-घेवाण, नव्या पिढीचा सहभाग आणि सामाजिक परिवर्तनाचा मार्ग यावर विविध सत्रांतून चर्चा होणार आहे. सांस्कृतिक संध्यासुद्धा आयोजिली जात असून सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजन दीपकदादा ओंकार यांच्याकडे आहे.
आंबेडकरी बांधवांनी उपस्थित राहून परिषद यशस्वी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.