किनवट : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून बेग नईमा बेगम मिर्झा सईद यांनी दिग्गज नेता साजिद निसार खान यांचा १३ मतांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अनुभवी राजकारण्याला पराभूत करून त्यांनी नगरपरिषदेत दमदार प्रवेश केला असून, या निकालाने किनवटच्या राजकारणातील अनेक वर्षांचा समीकरणबदल अधोरेखित झाला आहे.
खान कुटुंबाचा किनवटच्या राजकारणातील दबदबा सर्वपरिचित. मात्र यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे बदलाचा कौल दिला. त्यामुळे शहरात नवीन नेतृत्वाच्या उदयाची चर्चादेखील सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, मतदारांनी महिलांना दिलेल्या संधीला प्रतिसाद देत नईमा मिर्झा यांना मोठे जनसमर्थन मिळाल्याचे बोलले जात आहे.
नईमा बेगम या शासकीय कंत्राटदार आणि सामाजिक कार्यकर्ता अन्वर मिर्झा यांच्या मातोश्री असून त्यांच्या विजयामागे कुटुंबाचा एकसंध प्रयत्न निर्णायक मानला जात आहे. घराघरातील थेट संवाद, साधेपणा आणि सामाजिक प्रश्नांवर घेतलेली ठाम भूमिका यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांची संख्या वाढत गेली. प्रचारादरम्यान महिलांसह तरुण वर्गाकडूनही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, नगर परिषदेत महाविकास आघाडी बहुमताने सत्तेत आली आहे. या निकालात मुस्लिम मतांची भूमिका महत्वाची ठरल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे मुस्लिम समाजाकडून प्रशासनात योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातच उपनगराध्यक्ष पदासाठी बेग नईमा बेगम मिर्झा सईद यांचे नाव आघाडीवर असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे.
राजकीय विश्लेषकांचं मत आहे की, नईमा मिर्झा यांना उपनगराध्यक्षपदाची संधी दिल्यास मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळून सकारात्मक संदेश जाईल. तसेच महिला नेतृत्वाला चालना मिळून शहरात परिवर्तन घडविण्याच्या दिशेने हा निर्णय मोलाचा ठरेल.
आता महाविकास आघाडीच्या नेतृत्वाकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०२५ च्या निवडणुकीचा ‘बदल’ हा संदेश सत्ता स्थापनेत कितपत परावर्तित होतो, याचा निकाल लवकरच स्पष्ट होणार आहे.
Tags
||जिल्हा||

