भीमा कोरेगाव शौर्यदिनासाठी प्रशासन सज्ज; विजयस्तंभ परिसरात पाहणी शांततेत सोहळा पार पाडण्याचा संकल्प – डॉ. हर्षदीप कांबळे


भीमा कोरेगाव : शौर्य, समता आणि बंधुभावाचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभाला १ जानेवारीला अभिवादनासाठी देशभरातून लाखो अनुयायी मोठ्या संख्येने येतात. यंदाच्या शौर्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी विजयस्तंभ परिसराला भेट देत तयारीचा आढावा घेतला.

डॉ. कांबळे यांनी जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, बार्टी व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. सोहळ्याच्या सुविधांसाठी १५ कोटींचा निधी तातडीने मंजूर झाला असून त्या संदर्भातील शासन निर्णय दिवसभरातच जाहीर करण्यात आला. विभागाच्या इतिहासात प्रथमच प्रधान सचिवांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून तयारीचे नियोजन तपासल्याची नोंद यावेळी झाली.


“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुतेच्या मूल्यांचा आदर राखून हा सोहळा शांततेत आणि सन्मानाने साजरा व्हायला हवा. ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे डॉ. कांबळे म्हणाले.
शौर्यदिनासाठी प्रशासन, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था व नागरिक यांच्यात समन्वय वाढवून नियोजनाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यांच्या पुढाकारामुळे यंदाचा शौर्यदिन हा केवळ अभिवादन सोहळा न राहता संविधानिक मूल्यांचा उत्सव ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp