किनवटच्या दुर्गम भागासाठी आरोग्याचा नवा आशेचा किरण; २४ डिसेंबरला साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण


किनवट :
महाराष्ट्र–तेलंगणाच्या सीमावर्ती, अतिदुर्गम व आदिवासीबहुल किनवट परिसरातील जनतेसाठी दर्जेदार, आधुनिक व परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टिस्पेशालिटी विश्वस्त हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा बुधवार, दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. हा सोहळा भारत जोडो युवा अकादमी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भारत जोडो युवा अकादमीचे अध्यक्ष डॉ.अशोक बेलखोडे व सचिव माधव बावगे यांनी दिली.

थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या सेवाभावी विचारांनी प्रेरित होऊन उभारण्यात आलेले हे रुग्णालय दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे. येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन सेवा तसेच मल्टिस्पेशालिटी उपचार माफक दरात उपलब्ध करून देण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.

या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे राहणार असून उद्घाटन पद्मश्री डॉ. अभय बंग (सर्च, गडचिरोली), मा. डॉ. वेदप्रकाश मिश्रा (ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण सल्लागार) आणि पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (ज्येष्ठ नेत्रतज्ञ) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुश्री मेधाताई पाटकर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री दर्जाचे नेते मा. ना. हेमंत पाटील, खासदार नागेश पाटील आष्टीकर ,आमदार भीमराव केराम, कोकीलाबेन हॉस्पिटलच्या भूलतज्ञ विभाग प्रमुख डॉ. अलका मांडके, एमआयडीसीचे सहसंचालक विवेक घोडके, गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील, तसेच आरोग्य, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

लोकार्पण सोहळ्यानिमित्त २४ डिसेंबर रोजी सायं. ५ वाजता संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, अंजली व नंदिनी गायकवाड भगिनी (झी सारेगमप विजेते, इंडियन आयडॉल फेम) यांच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय २५ डिसेंबर रोजी सायं. ५ वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून सुप्रसिद्ध कवी अनंत राऊतप्रकाश घोडके आणि गीतकार डॉ. विनायक पवार यांची उपस्थिती लाभणार आहे.

हा संपूर्ण कार्यक्रम एम.आय.डी.सी. कोठारी, ता. किनवट, जि. नांदेड येथे होणार असून, या लोकार्पण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारत जोडो युवा अकादमी व साने गुरुजी रुग्णालय परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.



Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp