किनवट नगरपरिषद मतमोजणीसाठी कडक पोलीस बंदोबस्त २१ डिसेंबर रोजी मतमोजणी; ड्रोन कॅमेऱ्यांतूनही नजर


किनवट :
किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक–२०२५ अंतर्गत रविवार (,दि. २१) रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा बंदोबस्ताची आखणी केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिली.

नगरपरिषद कार्यालयात मतमोजणीसाठी दोन स्तरांचा स्ट्रॉंग गार्ड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पहिल्या स्तरात एसआरपीएफचे जवान, तर दुसऱ्या स्तरात बाहेरील भागात पोलीस अधिकारी व अंमलदार तैनात राहणार आहेत.
वाहतूक सुरळीत राहावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक–खैरोद्दीन–अशोक स्तंभ असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. मतमोजणीदरम्यान नगरपरिषद मुख्य गेट व परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी जिजामाता चौक येथे बॅरिकेटिंग करण्यात येणार आहे. केवळ उमेदवार व त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार आहे.
मतमोजणी कक्षात भ्रमणध्वनी व इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास मनाई करण्यात आली असून, पाच ठिकाणी सुरक्षा तपासणी केली जाणार आहे. या बंदोबस्तासाठी १ एसडीपीओ, २ पीआय, १० एपीआय/पीएसआय, ८० पोलीस अंमलदार, १५ महिला पोलीस, एसआरपीएफ, आरसीपी प्लाटून व १०० होमगार्ड तैनात राहणार आहेत.
शहरातील संवेदनशील भाग, मिश्रवस्ती, प्रमुख चौक, उमेदवारांची निवासस्थाने व राजकीय पक्ष कार्यालयांसमोर विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतमोजणीच्या दिवशी नगरपरिषद परिसराच्या २०० मीटर अंतरातील दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून, संबंधितांना नोटिसा देण्यात येत आहेत. तसेच उपद्रवी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर BNSS कलम १६३ नुसार प्रतिबंधक कारवाई सुरू आहे.
निकालानंतर फटाके, गुलाल, मिरवणूक व घोषणाबाजी टाळावी, तसेच पराभूत उमेदवारांच्या घरासमोर कोणतीही घोषणा करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. मतमोजणीदरम्यान परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे व व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp