किनवट, ता. १८ : किनवट व माहूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) खरेदी केंद्रावर विक्रीस परवानगी देण्याच्या मागणीसंदर्भात राष्ट्रीय जनजाती आयोगाच्या मुख्यालयात, नवी दिल्ली येथे महत्त्वपूर्ण सुनावणी पूर्ण झाली.
किनवट विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी आज (ता. १८) राष्ट्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतारसिंगजी आर्या यांची भेट घेऊन या प्रश्नाबाबत सविस्तर मांडणी केली.
या सुनावणीदरम्यान भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाचे प्रतिनिधी तसेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCI) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (CMD) उपस्थित होते. बैठकीत किनवट–माहूर तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती, सीसीआय केंद्रांची अपुरी संख्या, खरेदी केंद्र उशिरा सुरू होणे, तसेच कापूस खरेदीतील तांत्रिक व प्रशासकीय अडचणी याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
आमदार भीमराव केराम यांनी, किनवट व माहूर हा आदिवासीबहुल व दुर्गम भाग असून शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील सीसीआय केंद्रांवर वेळेवर खरेदीची सुविधा न मिळाल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या जवळ असलेल्या तेलंगणातील आदिलाबाद सीसीआय केंद्रावर कापूस विक्रीस परवानगी देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
राष्ट्रीय जनजाती आयोगाच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल घेत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली. या सुनावणीमुळे किनवट–माहूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात या निर्णयातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

