किनवट : मकर संक्रांतीच्या गोडव्यासोबतच किनवटच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासह स्वीकृत सदस्यपदाची निवड प्रक्रिया येत्या १४ जानेवारी रोजी पार पडणार असून, या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष केंद्रित झाले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुजाता एंड्रलवार यांनी पीठासीन अधिकारी म्हणून सर्व नगरसेवकांना पत्रक जारी केले असून, नगर परिषदेच्या सभागृहातच ही निवडणूक होणार आहे.नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही. २१ नगरसेवक आणि नगराध्यक्षांचे एक मत अशा एकूण २२ सदस्यांच्या सभागृहात सत्तेचे गणित गुंतागुंतीचे झाले आहे. महायुतीकडे १०, तर आघाडीकडे ८ जागा आहेत. त्यामुळे उर्वरित तीन अपक्ष नगरसेवक हेच सत्तेच्या चाव्या हातात धरून बसले असून, विजय-पराजयाचा निर्णय त्यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. दोन्ही बाजूंनी अपक्षांची मनधरणी जोरात सुरू असून, राजकीय ‘फिल्डिंग’ रंगताना दिसत आहे.चर्चेत असलेली नावेमहायुतीकडून:
उपनगराध्यक्षपदासाठी श्रीनिवास नेम्मानीवार, जरिना खानम साजीद खान, अभय नगराळे आणि गुलबखत अकबर खान यांची नावे पुढे येत आहेत. स्वीकृत सदस्यपदासाठी अजय चाडावार, माजी नगराध्यक्ष दिनकर चाडावार, निशांत चाडावार व साजीद खान यांची नावे चर्चेत आहेत.आघाडीकडून:
उपनगराध्यक्षपदासाठी मोहम्मद हसन, प्रवीण राठोड व अभय महाजन हे उमेदवार आघाडीवर मानले जात आहेत. तर स्वीकृत सदस्यपदासाठी प्रशांत कोरडे, जहीर खान आणि दीपक नेम्मानीवार यांची नावे पुढे आहेत.सध्याच्या गणितानुसार आघाडीचे पारडे किंचित जड असल्याची चर्चा असली तरी, फोडाफोडीचे राजकारण आणि ऐनवेळी होणाऱ्या जुळवाजुळवीमुळे निकालाचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम एखादी नवी शक्कल लढवून बाजी पलटवतात का, याकडे शहरवासीयांच्या डोळ्यांचे लक्ष लागले आहे. १४ जानेवारी रोजी होणारी ही निवड प्रक्रिया किनवटच्या राजकारणाला नवी दिशा देणार, हे निश्चित.
Tags
||जिल्हा||
