नायगाव : ज्ञान संवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ, धुप्पा (ता. नायगाव) या नामांकित शिक्षण संस्थेच्या वतीने कर्मयोगी पुरस्कार देऊन दीपक कदम (प्रमुख, आंबेडकरवादी मिशन) यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी बोलताना दीपक कदम म्हणाले, “शिक्षणक्रांती हीच देशात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवू शकते. त्यासाठी पालक, विद्यार्थी आणि समाजाने एकत्रितपणे पुढाकार घ्यावा.”
पालकांनी रामजी सपकाळ आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मुलांसाठी उंच स्वप्ने पाहावीत, ती पूर्ण करण्यासाठी गुणवत्तापूर्ण व जागतिक स्तराचे शिक्षण द्यावे, उद्योगक्षेत्रात संधी निर्माण कराव्यात, तसेच आर्थिक व राजकीय साक्षरता वाढविणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
संस्थेच्या वतीने शाळेमार्फत कुटुंबस्तरावर विद्यार्थ्यांच्या सहभागातून व्यसनमुक्ती प्रयोग, परिसर स्वच्छता, आर्थिक साक्षरता अभियान असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असल्याची माहिती संस्थेचे सचिव संजय पाटील व प्राचार्या सरोज संजय पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमात माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे व डॉ. यशवंत चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच खासदार प्रा. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ८१ वर्षे पूर्ण करणारे स्वच्छता दूत माधवराव पाटील शेलगावकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सन्मानपत्राचे शब्दांकन इंजी. राजे पाटील यांनी केले.
कार्यक्रमाला प्रा. विजय पाटील बेटमोगरेकर महाराज यांच्यासह किमान दोन हजार विद्यार्थी, पालक व प्रतिष्ठित नागरिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती लाभली.
Tags
||महाराष्ट्र||

