हिंसेपेक्षा हिंसेचे समर्थन अधिक घातक : प्रा. गौतमीपुत्र कांबळे


गडहिंग्लज, दि. २५ : ‘जात व धर्माची ओळख माणसाला हळूहळू जातीय व धार्मिक बनवते. पुढे हीच मानसिकता जात्यांधपणा आणि धर्मांधपणाकडे घेऊन जाते. जात्यांध, धर्मांध माणूस अखेर हिंसक बनतो आणि हिंसेचे समर्थन करू लागतो. प्रत्यक्ष हिंसेपेक्षा हिंसेचे समर्थन अधिक घातक ठरते, कारण त्यातून अनेक चुकीच्या प्रवृत्ती बळावतात,’ असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक व सेक्युलर मुव्हमेंट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी व्यक्त केले.

       नगरपरिषदेच्या साने गुरुजी वाचनालयातर्फे आयोजित लोकशिक्षण व्याख्यानमालेच्या समारोप व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साधना शिक्षण संस्थेचे सचिव जे. बी. बारदेस्कर होते, तर सदानंद वाली यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरपालिकेच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
   पुढे बोलताना कांबळे म्हणाले की, ‘कोणत्या जातीत, धर्मात किंवा देशात जन्म घ्यायचा, हे आपल्या हातात नसते. त्यामुळे त्या ओळखींबाबत अभिमान असणे स्वाभाविक आहे. मात्र, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन जो माणूस माणुसकीची वाट चालतो, तोच खरा मनुष्य म्हणावा लागेल. आज प्रवाहाविरुद्ध पोहणारे कमी असून, प्रवाहासोबत वाहून जाणारेच अधिक आहेत. हीच आपल्या समाजाची मोठी शोकांतिका आहे.’
     गौतमीपुत्र कांबळे यांना पूज्य साने गुरुजी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार गौराबाई सलवादे यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार महादेवी सलवादे व कुटुंबीयांनी स्वीकारला.
मनीषा वालीकर यांना पूज्य साने गुरुजी गुणवंत शिक्षक पुरस्कार, तर आणाप्पा खुडे व मंजिरी देशपांडे यांना कै. भिकाजीराव मोहिते आदर्श वाचक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
   नगराध्यक्ष महेश तुरवतमठ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गणपतराव पाटोळे, दिनकर खबरे, राजत्री कोले, अर्जुन हराडे यांनी मानपत्रांचे वाचन केले. जे. बी. बाकर खामुनीव यांनीही मनोगत व्यक्त केले.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp