छत्रपती संभाजीनगर,दि.२७ : आजच्या काळात वर्तमानपत्रातील बातम्यांची जागा भावनांनी घेतली असून, बुद्धिनिष्ठ मतांची जागा बुद्धीशून्य वासनांनी घेतली आहे. जबाबदार लोकांच्या विवेकाला साद घालण्याऐवजी बेजबाबदार आवाहनांचा सुळसुळाट होत आहे, अशी परखड मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४३ सालीच केली होती. या विचारांचा अन्वय आजच्या माध्यमविश्वाशी लावत ‘मूकनायक दिना’निमित्त मेत्ता संघाच्या वतीने एकदिवसीय वैचारिक परिषद आयोजित करण्यात आली आहे.
ही परिषद ३१ जानेवारी २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये होणार असून सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध सत्रांतून आंबेडकरी पत्रकारिता, संवादशास्त्र, कला, लोकसंवाद व नवमाध्यमांवर सखोल चर्चा होणार आहे.
परिषदेतील पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणार असून त्याची संकल्पना ‘आंबेडकरी पत्रकारिता : प्रतिकार, प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्यायासाठीचे संवादशास्त्र’ अशी आहे. या सत्राचे उद्घाटन प्रसिद्ध सिने-नाट्य व दूरदर्शन अभिनेते प्रवीण डाळिंबकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ. यशवंत भंडारे आंबेडकरी पत्रकारितेचे स्वरूप, व्याप्ती व आव्हाने मांडणार असून, आयु. शांतीलाल गायकवाड मुख्य प्रवाही माध्यमे व सामाजिक न्याय यावर चिकित्सात्मक दृष्टिक्षेप मांडतील. तसेच डॉ. स्वर्णमाला म्हस्के दलित-बहुजन महिलांच्या संदर्भात माध्यमांची भूमिका स्पष्ट करतील, तर राहुल पगारे आंबेडकरी संवादशास्त्रातील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक राजकारणावर प्रकाश टाकतील.
दुपारी २ ते २.३० या वेळेत मध्यांतरानंतर दुसरे सत्र दुपारी २.३० ते सायंकाळी ५ या कालावधीत ‘न्यू मिडिया, कला आणि लोकसंवाद’ या विषयावर होणार आहे. या सत्रात प्रा. डॉ. प्रकाश शिरसाठ आंबेडकरी संवादशास्त्रातील कला व सामूहिक चेतनेवर मांडणी करतील. डॉ. वैशाली बोडले लोककलेची आंबेडकरी चळवळीतील भूमिका स्पष्ट करतील, तर प्रा. संजय मोहोड आंबेडकरी जलसा, लोकसंवाद आणि सामाजिक परिवर्तन यावर भाष्य करतील.
याशिवाय प्रा. डॉ. किशोर वाप आंबेडकरी संगीत व प्रति-प्रभुत्ववादी राजकारणाचा संवाद उलगडतील. संजना खंदारे आंबेडकरी महिलांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्ममधील संधी व आव्हाने मांडतील, तर उन्मेष खंडागळे नवमाध्यमे, संस्कृती आणि भारतीय समाजाच्या पुनर्रचनेवर आपले विचार व्यक्त करतील.
परिषदेबाबत अधिक माहितीसाठी डॉ. सचिन बनसोडे (९४०५३४३५४०), डॉ. संजय पाईकराव (९६७३७८६२३८) व रत्नदीप रगडे (७०३०३०५७९५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
||महाराष्ट||
