क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आदिवासी विकास व संशोधन केंद्रात विचारांचे प्रबोधन


किनवट :  येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत कार्यरत कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

   या कार्यक्रमाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि स्त्रीमुक्तीच्या विचारांचा जागर करत त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा वारसा विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे समन्वयक डॉ. मार्तंड कुलकर्णी होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांनी समाजपरिवर्तनाची चळवळ गतिमान केली. शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांना आत्मसन्मान, स्वातंत्र्य व प्रगतीची दिशा मिळाली, असे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘जीवनपट’ (लघुपट) प्रदर्शित करण्यात आला. या लघुपटातून त्यांच्या संघर्षमय जीवनाची, सामाजिक अन्यायाविरुद्धच्या लढ्याची आणि शिक्षणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांची प्रभावी मांडणी करण्यात आली.
केंद्राचे सह-समन्वयक डॉ. सुनील व्यवहारे यांनी मनोगत व्यक्त करताना सावित्रीबाई फुले यांना केवळ शिक्षिका म्हणून पाहणे अपुरे ठरेल, असे स्पष्ट केले. त्या थोर समाजसुधारक, स्त्रीमुक्तीच्या प्रणेत्या आणि संवेदनशील कवयित्री होत्या. अपमान, उपेक्षा व अन्याय सहन करूनही त्यांनी समाजहिताचे कार्य अखंड सुरू ठेवले. त्यांचा संयम, धैर्य व जिद्द आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला केंद्राचे सह-समन्वयक डॉ. सुरेंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. त्यांनी आजच्या काळात सावित्रीबाई फुले यांच्या वैज्ञानिक, समतावादी व स्त्रीमुक्तीच्या विचारांची नितांत गरज असल्याचे अधोरेखित केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. योगेश अंबुलगेकर यांनी केले.
  या कार्यक्रमास केंद्रातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना अभिवादन करून आणि त्यांच्या विचारांचा जागर करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp