जिजाऊ–सावित्री विचारांचा जागर; किनवटमध्ये वैचारिक-सांस्कृतिक सोहळा उत्साहात


किनवट, दि. २७ : 
राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती महोत्सव समिती, किनवट यांच्या वतीने आयोजित ‘जिजाऊ–सावित्री विचारांचा जागर’ हा भव्य वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच  पोलीस स्टेशनजवळील दुर्गा मैदानात सायंकाळी  उत्साहात पार पडला.

    स्त्री शिक्षण, सामाजिक समता, स्त्री सक्षमीकरण, स्वराज्याची प्रेरणा आणि राष्ट्रनिर्मितीचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सुजाता विनोद एन्ड्रलवार यांनी भूषविले. स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य शुभांगी प्रशांत ठमके उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ माँसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विचारांची आजच्या समाजातील उपयुक्तता अधोरेखित केली.
          या वैचारिक सोहळ्यात राज्यातील सुप्रसिद्ध कवी-गझलकार अनंत राऊत (अकोला) आणि सिनेगीतकार प्रा. डॉ. विनायक पवार (रायगड) यांनी आपल्या प्रभावी कविता व विचारप्रबोधनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ‘मित्र वनव्यातील गारव्यासारखा’ तसेच ‘संभाजी महाराजांवरील जुलूमशाहीचा एक काळ’ या कवितांनी वातावरण भावूक झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक बबन वानखेडे यांनी केले, तर सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रोत्यांच्या गर्दीने दुर्गा मैदान अक्षरशः फुलून गेले होते.जिजाऊ माँसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp