जिल्हा व सत्र न्यायालय किनवट येथे तातडीने कार्यान्वित करा; आमदार भिमराव केराम यांची भेट घेऊन न्यायव्यवस्थेच्या सक्षमीकरणाची मागणी


किनवट  : किनवट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांची नुकतीच भेट घेऊन जिल्हा व सत्र न्यायालय  येथे तातडीने कार्यान्वित करण्यात यावे, यासाठी राज्य शासनाच्या मंत्रालय स्तरावर प्रभावी पाठपुरावा करावा, अशी ठाम मागणी वकील संघाच्या शिष्टमंडळाने केली आहे.

     सध्या किनवट व माहूर, लगतच्या आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी नांदेड येथे जावे लागत आहे. त्यामुळे वेळ, खर्च व दैनंदिन रोजगारावर मोठा परिणाम होत असून सामान्य नागरिक, वकील, साक्षीदार यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर किनवट येथे मंजुर करण्यात आलेले जिल्हा व सत्र न्यायालय लवकरात लवकर सुरू करावे,ही येथील नागरिकांची रास्त मागणी आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत न्यायालय सुरू झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना दिलासा मिळेल, न्यायप्रक्रिया सुलभ व गतिमान होईल, तसेच आदिवासी व वंचित घटकांना न्याय मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ होईल, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
आमदार भीमराव केराम यांनीही या मागणीचे महत्त्व लक्षात घेऊन शासन स्तरावर सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती किनवट वकील संघाचे अध्यक्ष ॲड किशोर मुनेश्वर यांनी दिली.
किनवट येथे जिल्हा व सत्र न्यायालय कार्यान्वित होणे हे केवळ प्रशासकीय गरज नसून, न्यायव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp