किनवट, ता. १० : बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सार्वजनिक शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने येथे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ता.१९ फेब्रुवारी रोजी वक्तृत्व, निबंध, रंगभरण तसेच लेझीम अशा स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
या स्पर्धांना १९ फेब्रुवारी रोजी सकाळपासून सुरुवात होणार असून रंगभरण स्पर्धा सकाळी ७ ते ८, निबंध स्पर्धा सकाळी ८ वाजता, वक्तृत्व स्पर्धा सकाळी ९ ते ११ तर लेझीम स्पर्धा सकाळी १०.३० वाजता पार पडणार आहेत. सर्व स्पर्धांसाठी इयत्ता सहावी ते आठवी हा वयोगट निश्चित करण्यात आला आहे.
निबंध स्पर्धेसाठी “छत्रपती शिवाजी महाराज व स्त्री सुरक्षितता” किंवा “माता जिजाऊ यांची शिवरायांना शिकवण” असे विषय देण्यात आले असून वक्तृत्व स्पर्धेसाठी “निधर्मी राजा छत्रपती शिवाजी महाराज” हा विषय निश्चित करण्यात आला आहे.
या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकासाठी ३००१ रुपये व सन्मानचिन्ह, तर द्वितीय क्रमांकासाठी २००१ रुपये व सन्मानचिन्ह असे आकर्षक बक्षिसांचे स्वरूप ठेवण्यात आले आहे. सर्व स्पर्धा जुने नगरपरिषद प्रांगण, किनवट येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमांची सांगता २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या व्याख्यानाने होणार असून, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान हु. गोंडराजे शंकरशहा रघुनाथशहा व्यासपीठावर आयोजित करण्यात आले आहे.
या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती करीत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Tags
||जिल्हा||
