किनवट, ता.११ : शहरातील प्रमुख बाजारपेठांसह विविध भागांत मागील काही महिन्यांपासून राजरोसपणे मटका व जुगार सुरू असल्याचा आरोप करत या अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांना आज(ता.११) .दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील भाजीपाला मार्केट, मटन मार्केट, बसस्थानक परिसर, सुभाषनगर, समतानगर, हमाल कॉलनी, रेल्वे स्टेशन, गंगानगर तसेच आठवडी बाजार परिसरात ‘मिलन’, ‘श्रीदेवी’, ‘पद्मावती’, ‘टाईम बाजार’, ‘कल्याण’ आदी नावांनी मटका व्यवसाय सुरू आहे. कमी वेळेत अधिक पैसा मिळवण्याच्या मोहात कामगार व मजूर वर्ग मटक्याच्या आहारी जात असून दिवसभराची मजुरी या धंद्यात खर्च होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आठवडी बाजाराच्या दिवशी शहर व ग्रामीण भागातील तरुणांसह नागरिकांची मटका बुक्कीवर मोठी गर्दी होत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. सुशिक्षित बेरोजगारांना हाताशी धरून काही धनदांडग्यांकडून हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करत दररोज मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचे सांगण्यात आले आहे. या ठिकाणी पैशांच्या देवाणघेवाणीतून भांडणे होत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
मटका व्यतिरिक्त शहरात जुगाराचे अड्डेही वाढल्याने नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही शिवसेनेने दिला आहे. निवेदनावर शहरप्रमुख प्रशांत कोरडे, माजी शहरप्रमुख संतोष यलचलवार, प्रभू कोले, सुनील तकलवार, महेश मंडारे, जिन्ना पबतवार, आनंद क्यातमवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Tags
||जिल्हा||
