![]() |
किनवट,ता.१२ : देशभरातील प्रमुख कामगार व शेतकरी संघटनांनी दिलेल्या अखिल भारतीय औद्योगिक संप व ग्रामीण भारत बंदच्या हाकेला पाठिंबा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) तालुका समितीच्या वतीने गुरुवारी(ता.१२)राजमाता जिजाऊ चौक येथे निदर्शने करण्यात आली.
यावेळी केंद्र सरकारच्या श्रम संहितांमुळे कामगारांचे हक्क धोक्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच वीज क्षेत्रातील धोरणे, स्मार्ट मीटर योजना, बियाणे विधेयक व शेतीसंदर्भातील निर्णयांमुळे शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक ताण वाढत असल्याची टीका कार्यकर्त्यांनी केली. देशाच्या आर्थिक व कृषी धोरणांमध्ये कॉर्पोरेट हितसंबंधांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
माकप नेते कॉ. अर्जुन आडे यांनी बोलताना केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे ग्रामीण रोजगाराच्या संधी कमी होत असल्याचे सांगत देशव्यापी संपाला पाठिंबा दर्शवला. शेतकरी, कामगार व शेतमजुरांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
या आंदोलनात माकपचे आडेलू बोनगीर, शेवंता आडे, सुनीता बोनगीर, मनोज सलावार, नंदू मोदुकवार, शे. चांद, फरीद बाबा, रंगराव चव्हाण, सुदाम बर्गे, उत्तम वाघमारे, मोहन जाधव, महेमूद पठाण, अनिल आडे, नाथा बादड आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Tags
||जिल्हा||
