दयाळ धानोरा हादरले : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी मृत्युमुखी, आठ जखमी; चौघांची प्रकृती गंभीर

किनवट : दयाळ धानोरा(ता.किनवट)येथे बुधवारी (दि.११) मध्यरात्री अस्वलाच्या हल्ल्याने गाव दहशतीत सापडले. या भीषण घटनेत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.

   मृत शेतकऱ्याचे नाव दत्ता बळीराम जाधव असे असून ते शेतात पाणी देण्यासाठी गेले असताना अस्वलाने अचानक हल्ला केला. त्यांच्या सोबत असलेले रमेश बळीराम जाधव (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेत चंद्रसिंग शेषराव राठोड (वय३०), शंकर तानाजी जाधव (वय५०), सुदर्शन दत्ता पवार (वय३५), पंडित जयसिंग जाधव (वय२२), विनोद शेषराव राठोड (वय३४), अरविंद शेषराव जाधव (वय३५), संजय दत्ता जाधव (वय३५) आणि रमेश बळीराम जाधव (वय४५) हे जखमी झाले. चंद्रसिंग राठोड, शंकर जाधव, सुदर्शन पवार व रमेश जाधव यांची प्रकृती गंभीर असून चंद्रसिंग राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्री शेतात गेले होते. त्यावेळी अस्वलाने प्रथम दत्ता जाधव यांच्यावर झडप घातली. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून इतर शेतकरी मदतीसाठी धावले; मात्र आक्रमक झालेल्या अस्वलाने सलग नऊ जणांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच इस्लापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने गावात आणून उपचारासाठी हलविण्यात आले. शिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले.
   बचावकार्यादरम्यान स्थानिक ग्रामस्थ, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले. एकाच वेळी एवढ्या संख्येने लोकांवर अस्वलाने हल्ला केल्याची घटना दुर्मीळ मानली जात असून वन विभागाने तातडीने गस्त वाढवावी, पिंजरे लावून अस्वलाला जेरबंद करावे तसेच बाधित कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, घटनेनंतर दयाळ धानोरा व आसपासच्या परिसरातील शेतकरी रात्री शेतात जाण्यास घाबरत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने त्वरीत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp