![]() |
| डॉ.अशोक बेलखोडे |
किनवट : अतिदुर्गम आदिवासी भागात निस्वार्थ भावनेने आरोग्यसेवा व सामाजिक कार्य करणारे डॉ. अशोक बेलखोडे यांना ‘आय. एम. ए. नवरत्न’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा सन्मान दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या उद्घाटन सत्रात प्रदान करण्यात येणार असून, हा कार्यक्रम दि. १४-१५ फेब्रुवारी रोजी आयोजित पहिल्या अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य–संस्कृती संमेलनाच्या निमित्ताने होणार आहे.
हे दोन दिवसीय संमेलन इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे स्थळ बीड बायपास रोडवरील एमआयटी कॉलेजमधील ‘मंथन हॉल’ असे आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील साहित्य, संस्कृती, विचार व मानवी मूल्यांचा प्रसार हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्रभरातील वैद्यकीय क्षेत्रातील साहित्यिक, कवी, गझलकार व अभ्यासक या संमेलनात सहभागी होणार आहेत. दोन दिवसांच्या या सोहळ्यात कवी संमेलन, मराठी गझल संमेलन, ललित लेख संमेलन, नाट्यप्रयोग तसेच विविध विषयांवरील परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.
संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक व विचारवंत डॉ. जब्बार पटेल लाभले असून, उद्घाटक म्हणून ‘पानिपत’कार विश्वास पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लेखक व मानसोपचार तज्ञ डॉ. मोहन आगाशे यांची उपस्थिती लाभणार आहे.
डॉ. बेलखोडे यांनी साने गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून किनवटसारख्या दुर्गम भागात आदिवासी समाजासाठी आरोग्यसेवा, जनजागृती व सामाजिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत आय. एम. ए.तर्फे ‘आय. एम. ए. नवरत्न’ या पुरस्काराने गौरविण्यात येत असल्याने किनवट तालुक्यात समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
मराठी भाषा घराघरांत पोहोचविणे व वैद्यकीय क्षेत्रातील साहित्यिकांना एकत्र आणणे हे या संमेलनाचे उद्दिष्ट असून, या सन्मानामुळे किनवटच्या आरोग्य क्षेत्राचा गौरव वाढला आहे.
Tags
||महाराष्ट||
