
किनवट, दि. १४ : मानव–वन्यजीव संघर्ष (HWC) प्रकरणांतील पीडितांना न्यायप्रवेश सुलभ व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्या पत्रान्वये ‘NALSA Scheme on Access to Justice for Victims of Human–Wildlife Conflict (HWC) 2025’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी किनवट येथे टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
तालुका विधी सेवा समिती, किनवट अंतर्गत दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी ही टास्क फोर्स गठीत करण्यात आली. मानव–वन्यजीव संघर्षातील पीडितांना कायदेशीर मार्गदर्शन, नुकसानभरपाईसाठी अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व समुपदेशन आदी बाबींमध्ये सहाय्य करणे हे या समितीचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.
टास्क फोर्समध्ये अॅड. एम. यू. सर्पे (पॅनल विधीज्ञ), एल. वाय. मिसलवार (सहायक अधीक्षक, दिवाणी न्यायालय क. स्तर) व दत्ता मनोहर भालेराव (अधिकार मित्र – PLV) यांचा समावेश आहे. तसेच नोडल अधिकारी म्हणून एल. वाय. मिसलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिवाणी न्यायाधीश क. स्तर तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, किनवट यांच्या आदेशानुसार हा निर्णय जाहीर करण्यात आला. या उपक्रमामुळे मानव–वन्यजीव संघर्षग्रस्तांना न्यायप्रवेश अधिक सुलभ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, दयाल धानोरा(ता .किनवट) येथे ता.१० फेब्रुवारी रोजी रात्री पिकांना पाणी देणा-या शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला केला होता.या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता,चार शेतकरी गंभीर तर, आठ शेतकरी जखमी झाले होते.या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स चे सदस्य दत्ता भालेराव यांनी काल(ता.१३) दयाल धानोरा येथे भेट देऊन झालेल्या घटनेची माहिती घेतली.तसेच मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना तातडीची मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले.तसेच घटनेची सविस्तर माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आणि दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) यांना दिली.
Tags
||जिल्हा||