किनवट, दि.१४ : शहरातील विविध विकासकामे व प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी झेनित चंद्रा दोंतुला यांची नुकतीच भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
शहरातील मूलभूत सुविधांचा आढावा घेत नागरिकांच्या अडचणींबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या भेटीत पाणीपुरवठा व्यवस्थेची स्थिती, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी तसेच अतिक्रमण निर्मूलन या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शहरातील नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक सुविधा सुरळीत व दर्जेदार मिळाव्यात, यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नगराध्यक्षांनी केली.
यावेळी रोहन येंड्रलवार व अॅड. येऊतकर उपस्थित होते. प्रशासनाकडून मांडण्यात आलेल्या विविध विषयांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले.शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
Tags
||जिल्हा||
