किनवट, दि. १६ : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांच्या निर्देशानुसार ‘Implementation of NALSA Scheme on Access to Justice for Victims of Human Wild Life Conflict (HWC), 2025’ अंतर्गत किनवट तालुक्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. मानव–वन्यजीव संघर्षग्रस्तांना तातडीने न्यायप्रवेश व शासकीय मदत मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी तालुक्यातील दयाल धानोरा येथे झालेल्या अस्वल हल्ल्यात जखमी झालेल्या तसेच मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची माहिती संबंधित टास्क फोर्समार्फत संकलित करण्यात आली. घटनेनंतर तत्काळ पावले उचलत सदर अहवाल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांच्याकडे सादर करण्यात आला.
प्राधिकरणाने जखमी शेतकऱ्यांना तसेच मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी यासाठी संबंधित प्रशासनास सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून लाभार्थ्यांना लवकरात लवकर मदत मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मानव–वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये पीडितांना कायदेशीर मदत, मार्गदर्शन व शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळावा यासाठी ही टास्क फोर्स महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. किनवट तालुक्यातील नागरिकांसाठी हा उपक्रम दिलासादायक ठरत आहे.
Tags
||जिल्हा||