सचखंड नंदीग्रामला या //
या नांदेड नगरीला या //
विद्रोही जागर मांडला याहो जागराला //
या मराठवाड्यातून या
या डोंगरकड्यातून या
गोदेच्या थड्यातून या
आसनेच्या थड्यातून या
या मन्याड खोऱ्यातून या
या खेड्या पाड्यातून या
या नगरानगरातून या
या वाड्या झोपड्यातून या
हेच आवाहन तुम्हाला
हेच आवतान तुम्हाला //१// विद्रोही ...
स्वतंत्र भारतातही
इथं होती निजामशाही
जणू निजामी पेशवाई
अन्याया सीमाच नाही
मग हिंदू मुस्लीम भाई
झाले एकजूट या ठायी
काँग्रेसी गांधीवादी
कम्युनिस्ट समाजवादी
आजादीसाठी आले
लढले आंबेडकरवादी
वीरांनी दिली शहीदी
मग आली इथं आजादी
मुक्ती लढ्याला बलिदानाला
या वंदन करण्याला //२// विद्रोही...
सुगाव हे खेडंगाव
नांदेड शिवंला शीव
इथला नामांतर वीर
मवाडे जनार्दन नाव
जागवित होता गावं
मिळावं भिमाचं नाव
जातीवाद्यांनी रचला
याला संपवण्याचा डाव
घेरून एकटा जीव
घातले दिडशे घावं
इथं वीर हा शहीद झाला
या हो वंदन करण्याला //३// विद्रोही...
इथं मराठवाड्यामधी
टेंभुर्णी खेड्यामधी
याच नांदेड जिल्ह्यामधी
नामांतर लढ्यामधी
पोचीराम पुढ्यामधी
मनुवादी वेढ्यामधी
जिवंत जाळला वाघ
त्यांनी बांधून फासामधी
तो जय भीम गर्जत गेला
करण्या वंदन शहिदाला //४// विद्रोही...
वाघमारेचा गौतम
पॅंथर नगर जयभीम
पेटला ऊरी बेफाम
करीत घोष जय भीम
द्या रे द्या विद्यापीठाला
द्या म्हणे भिमाचं नाम
लाऊन घेतली आग
म्हणे जगणं हे बेकाम
शहीद झाला कामी आला
करण्या वंदन विराला //५// विद्रोही...
राणी अहिल्याबाई याहो
राजमाता जिजाऊ याहो
संत जनाई मिराबाई
कान्होपात्रा या बहिणाई
खरी खरी विद्येची देवी
या हो सावित्रीमाई
संगं आणा फातेमाला
तुम्ही याहो जागराला //६// विद्रोही...
या कामगार शेतकरी या
साऱ्या महिला कष्टकरी या
बिर्सा तंट्या तंटेकरी या
सारे शोषित आंबेडकरी या
मनुवाद अन् भांडवलदारी
नष्ट कराया गुलामगिरी या
सारे सारे कष्टकरी या
देऊ मुक्तीची ललकारी या
हाच वारसा आपला हो
हाच आरसा आपला //७// विद्रोही...
बुध्द कबीर या रविदास
आम्ही उभेच स्वागतास
संत नामदेव तुकोबा
या शिवबा या ज्योतिबा
राजर्षी शाहू महाराज
या जागराला आज
भीमराव मूकनायक या
लढू युद्ध सांस्कृतिक या
आणू समता समाजवाद
आम्ही भारताचे लोकं
शिवबाचे मावळे नेक
फुलेंचे सत्यशोधक या
भिमाचे भीम सैनिक या
हीच विद्रोहीची हाक
हेच आवतान तुम्हाला
तुम्ही या हो जागरा //८//. # विद्रोही ...#..
आदिनाथ इंगोले, नांदेड.
Tags
||महाराष्ट्र||


