प्रा. तौर यांनी १९८७ पासून बळीराम पाटील महाविद्यालयाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य हाती घेतले. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक मार्गदर्शनच नव्हे, तर जीवनमूल्यांची शिकवण दिली. आर्थिक, सामाजिक अडचणींनी ग्रासलेल्या विद्यार्थ्यांना उभारी देत त्यांच्यात आत्मविश्वास जागवण्याचे काम त्यांनी निष्ठेने केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.
किनवट या अत्यंत मागासलेल्या तालुक्यात सत्यशोधक विचारांचे बीजारोपण करून सामाजिक चैतन्य निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही त्यांनी केले. वंचित, उपेक्षित घटकांसाठी आवाज उठवणे, अन्यायाविरुद्ध भूमिका घेणे आणि समाजमनात विवेकाची ज्योत प्रज्वलित ठेवणे ही त्यांची ओळख बनली आहे. साहित्य, सामाजिक चळवळ आणि शैक्षणिक कार्य यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यात दिसून येतो.
त्यांच्या या बहुआयामी योगदानाची दखल घेत उद्या(ता.२८) नांदेड येथे आयोजित २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते त्यांना ‘विद्रोही जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार म्हणजे आयुष्यभर रंजल्या-गांजल्यांसाठी केलेल्या सेवेचा, अडचणीत सापडलेल्यांना दिलेल्या आधाराचा आणि समाजप्रबोधनासाठी झटलेल्या अथक परिश्रमांचा गौरव आहे. किनवटच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी त्यांनी पेटवलेला ज्ञानदीप आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत राहील, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.