धोकादायक वळणाचा बळी: कोठारीत पहाटे भीषण अपघात, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह

किनवट,ता‌.२६ : कोठारी चि.(ता .किनवट)येथील पेट्रोलपंपाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर आज(ता.२६)पहाटे सुमारे ५.४५ वाजता दुर्दैवी अपघात घडला. सकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नंदाबाई गौतम पाईकराव (वय ५०) यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

       स्थानिकांच्या माहितीनुसार, पेट्रोलपंपाजवळील हे वळण अत्यंत अरुंद व धोकादायक आहे. रस्त्याच्या कडेला वाढलेल्या बाभळीची झाडे व दाट झुडपे यामुळे समोरून येणारी वाहने वेळेवर दिसत नाहीत. त्यामुळे येथे अपघाताचा धोका कायम निर्माण होत असतो. यासंदर्भात अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या; मात्र ठोस उपाययोजना झाल्या नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, कोठारी येथील साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे यांनी दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित रस्ते प्राधिकरणाला लेखी निवेदन देऊन MIDC परिसरातील धोकादायक वळणाजवळील झुडपे व बाभळीची झाडे काढून टाकणे तसेच आवश्यक इशारा फलक बसविणे याबाबत मागणी केली होती. त्या पत्रात “गती कमी करा” सूचना फलक, परावर्तित इशारे, स्पीडब्रेकर तसेच रस्त्याचे स्पष्ट दिशादर्शक चिन्हांकन करण्याची मागणीही नमूद करण्यात आली होती.
    मात्र, या निवेदनानंतरही प्रत्यक्षात कोणतीही तातडीची कार्यवाही न झाल्यानेच ही दुर्घटना घडल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. या ठिकाणी यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात झाले असल्याचे नागरिक सांगतात. “अजून किती जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित वळण हे MIDC क्षेत्रात येत असून परिसरात रुग्णालये, उद्योग व इतर कारणांमुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. २४ तास सुरू असलेल्या आपत्कालीन सेवेमुळे रुग्णवाहिकांची सतत ये-जा सुरू असते, त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.
    डॉ. अशोक बेलखोडे यांनी घटनेबाबत दु:ख व्यक्त करत प्रशासनाने त्यांच्या २० फेब्रुवारीच्या पत्राची दखल घेऊन तात्काळ प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. “मानवी जीविताचे संरक्षण हीच सर्वोच्च जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील नागरिक आता ठोस आणि तातडीच्या कारवाईची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp