साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला. उद्घाटक डॉ . बजरंग बिहारी तिवारी, संमेलनाध्यक्ष लोकनाथ यशवंत, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ . अशोक राणा,प्रा.प्रतिमा परदेशी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
प्रा. तौर हे १९८७ पासून किनवट येथील बळीराम पाटील महाविद्यालयात अध्यापन करत असून त्यांनी दुर्गम, बंजारा व आदिवासी बहुल भागात ज्ञानप्रबोधनाची अखंड ज्योत तेवत ठेवली आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सामाजिक जाण, विचारस्वातंत्र्य आणि जीवनमूल्यांची दिशा दिली. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले.
किनवट या तेलंगाना सिमेवरच्या तालुक्यात सत्यशोधक विचारांचे बीजारोपण करून सामाजिक चैतन्य फुलविण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही त्यांच्या नावावर आहे. वंचित-उपेक्षित घटकांसाठी आवाज उठवणे, अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेणे आणि विवेकनिष्ठ समाजघडणीसाठी प्रयत्नशील राहणे ही त्यांची ओळख बनली आहे. मराठी साहित्य समीक्षा हे त्यांच्या कार्याचे एक महत्त्वाचे अंग मानले जाते.
ता. २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान आयोजित या संमेलनात साहित्यिक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रा. तौर यांचा झालेला गौरव हा किनवटच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
‘विद्रोही जीवन गौरव पुरस्कार’ हा त्यांच्या आयुष्यभराच्या त्याग, परिश्रम आणि रंजल्या-गांजल्यांसाठी केलेल्या सेवेचा सन्मान मानला जात असून त्यांच्या कार्यातून पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.